Media Production - , ,
आम्हाला विश्वास आहे की, आपल्या जीवनात पैशांचे काय महत्त्व आहे? पैसा कसा काम करतो? याबद्दल तुम्ही सजग आहात. त्यामुळेच तर तुम्ही जीवनात अधिक आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे वाटचाल करत आहात. म्हणजे, पैसा हेच जीवन आहे, असे ही नाही. पण सध्याच्या काळात पैशांशिवाय चांगले जीवन ही जगता येत नाही. पैसे मिळवणे ही गरज असली तरी ती एक कला आहे. हो खरंच! पैसे कमावणे एक कला आहे; परंतु याचा उपयोग करणे ही त्यापेक्षाही मोठी कला आहे. चाणक्याच्या नीतीनुसार, पैसे कमावण्यासोबतच त्याच्या उपयोगाची कोणतीही योजना तुमच्याकडे नसेल किंवा त्याचा वापर कसा करायचा याची ठोस कारणे नसतील तर तो पैसा काहीच कामाचा नाही. नुसता पैसा साठवून वाढणार नाही किंवा तुमच्या जीवनातही काही बदल घडून येणार नाही. त्यामुळे मिळवलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. यासाठी गुंतवणुकीच्या विविध पैलुंची आणि आर्थिक विषयांबाबत अद्ययावत घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. पैशांच्या जगात पहिली पायरी ही शिक्षणापासून सुरू होते. शिकणे हे कधीच संपत नाही आणि शिकलेले कधीच वायाही जात नाही. यासाठी आम्ही महामनी वेबपोर्टलच्या माध्यमातून आपल्यासाठी आर्थिक जगतातील अद्ययावत माहिती खास आपल्यासाठी साध्यासोप्या मराठी भाषेत घेऊन येत आहोत. ‘महामनी'च्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण लेख, विविध योजनांच्या अटी व नियम, गुंतवणूक करताना सतत पडणारे प्रश्न तसेच तज्ज्ञांद्वारे स्मार्ट विश्लेषण घेऊन येत आहोत.